Friday, May 4, 2012


स्वार्थी जनुक
रिचर्ड ड्वाकिन
अनुवाद निलेश हेडा

प्रकरण १: काही मूलभूत प्रश्न?
आता पृथ्वी ग्रहावर बुद्धिमान जीवन अशा वळणावर आलं आहे की त्याने आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन निश्चित करायला हवे. समजा आपल्यापेक्षा बुद्धिमान जीव पृथ्वी ग्रहावर आले तर मानवाच्या बुद्धिमत्तेची पातळी जाणून घेण्यासाठी ते कोणता पहिला प्रश्न विचारतील? ते विचारतील की, “काय ह्या मानवाने अजूनपर्यंत उत्क्रांती शोधली आहे?” आपण ह्या पृथ्वीवर का आहोत ह्याचा विचारही न करता असंख्य जीव सुमारे ३ हजार दस लक्ष वर्षांपासून ह्या ग्रहावर अस्तित्वात आहेत, तथापि, ह्या सर्व जीवांपैकी एकाला आपल्या पृथ्वी ग्रहावर असण्याच्या प्रयोजनाचा, स्वत:च्या अस्तित्वामागे असलेल्या कार्यकारणभावाचा अर्थ लागला. चार्लस डार्विन (Charles Darwin) हे त्या व्यक्तीचे नाव. खरं म्हणजे ह्या प्रश्नाची कल्पना डार्विनच्या आधीही अनेकांना आली होती परंतु डार्विन ने पहिल्यांदा आपण अस्तित्वात का आहोत याची तर्कसंगत कारणमीमांसा आपल्याला दिली. एखाद्या चौकस बुद्धीच्या लहान मुलांच्या डोक्यात येणा-या प्रश्नांना (जे आपण ह्या प्रकरणात विचारले आहेत) पहिल्यांदा पटण्याजोगे उत्तर डार्विनने दिले. आता पुढील काही प्रश्नांची उत्तरे देण्याकरिता आपल्याला अंधश्रद्धेची कास धरण्याची मुळीच गरज नाही. ते प्रश्न असे: जीवनाचा काही अर्थ आहे काय? आपण का आहोत? माणूस ही काय चीज आहे? ह्यामधील शेवटचा प्रश्न विचारल्यावर सुप्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ जी.जी. सिम्पसन (G. G. Simpson) यांनी म्हटले होते की, “इ.स. १८५९ च्या पुर्वी ह्या प्रश्नाचे उत्तर देणे म्हणजे निष्कारण वाद घालने होते आणि ह्या प्रश्नाचे उत्तर न देणे हीच सुदैवी स्थिती होती.”
आज उत्क्रांतीचा सिद्धांत हा संशय घेण्यासाठी तितकाच खुला आहे जितका की पृथ्वी सुर्याभोवती फिरते हा सिद्धांत. परंतु दुर्देवाने डार्विनच्या सिद्धांताची उपयोगिता अजुनही मोठ्या प्रमाणात रुजलेली नाही. प्राणीशास्त्र हे अजुनही विद्यापीठांमध्ये अल्पसंख्यांकात गणल्याजाणारा विषय आहे, आणि त्याला अभ्यासासाठी निवडणारे विद्यार्थी त्या विषयामध्ये असलेल्या अत्यूच्च दर्जाच्या तत्वज्ञानाला न समजून घेताच हा विषय निवडतात. तत्वज्ज्ञान आणि मानव शास्त्रे आजही अशा प्रकारे शिकवल्या जातात की जणू डार्विनचा जन्मच झाला नाही. तथापी जस जसा काळ उलटत जाईल तसतशी परिस्थिती बदलत जाईल यात शंकाच नाही. हे पुस्तक डार्विनच्या सिद्धांताची वकिली म्हणून लिहिल्या गेले नाही हे पुस्तक म्हणजे उत्क्रांतीच्या सिद्धांतामागील कारणांचा एका विशिष्ट अशा हेतूसाठी घेतलेला आढावा मात्र आहे. माझा हेतू आहे स्वार्थवाद (selfishness) आणि निस्वार्थ परोपकाराला (altruism) कारणीभूत असलेल्या जीवशास्त्राचा शोध घेणे.
अभ्यासासाठीच्या महत्त्वासोबतच मी मांडत असलेल्या विषयाचे सामाजिक महत्त्व सुद्धा आहे हे ओघानेच आले. आपले प्रेम-द्वेश, भांडणे-सहकार, देणे-चोरणे, लोभ-दानशुरता आणि आपल्या एकुणच सामाजिक जगण्याला ह्या विषयाने प्रत्येक जागी स्पर्श केला आहे. मी करत असलेले प्रस्तुत पुस्तकाबद्दलचे दावे लोरेंजच्या (Lorenz) ’न अग्रेजन’ (On Aggression) च्या बाबतीत, आर्डेच्या (Ardrey) ’द सोशल कान्ट्रक्ट’ (The Social Contract) च्या बाबतीत आणि इब्ल-आयबेसफेल्ट (Eibl-Eibesfeldt) च्या ’लव्ह अंड हेट’ ( Love and Hate) ह्या पुस्तकांच्या बाबतीत करता आले असते. पण ह्या पुस्तकांच्या बाबतीत महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, ह्या पुस्तकांच्या लेखकांनी ह्या विषयाला पुर्णत: चुकीच्या पद्धतीने बघीतले आहे! त्यांनी ह्या विषयाला चुकीच्या पद्धतीने घेतले कारण त्यांनी उत्क्रांती कशा प्रकारे काम करते हे समजण्यात गल्लत केली आहे. ह्या लेखकांनी आपल्या पुस्तकांची इमारत ह्या पुर्णत: चुकीच्या सिद्धांतावर उभारली आहे की, “उत्क्रांती मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते विविक्षीत प्रजातीचे (किंवा समूहाचे) भले”. पण वस्तुत: असे नसून “उत्क्रांतीत सर्वात महत्वाची गोष्ट असते प्रजातीमधील एका सभासदाचे (किंवा जनुकाचे) भले”. हे माझ्यासाठी हास्यास्पद आहे की, अशले मोंटॅगू (Ashley Montagu) ने लोरेंजची (Lorenz ) टीका करतांना असे म्हणावे की, लोरेंज हा टेनिसनचे सुप्रसिद्ध वाक्य “निसर्ग म्हणजे रक्ताने माखलेले दात आणि नखे आहेत” असे मानणा-या १९ व्या शतकातील विचारवंतापासून प्रभावित झाला आहे. या उलट मला जे लोरेंजचे उत्क्रांतीबद्दलचे विचार कळले आहेत त्यानुसार लोरेंज हा मोंटॅगु सोबतच आहे ज्याने टेनिसनच्या उपरोक्त वाक्याच्या उपयुक्ततेला फेटाळून लावले आहे. परंतु ह्या दोघांच्याही पार जाऊन मी म्हणेल की, “निसर्ग म्हणजे रक्ताने माखलेले दात आणि नखेच आहेत” हे टेनिसनचे वाक्य निसर्ग निवडीच्या सिद्धांताबद्दलची (natural selection) आपली आधुनिक समज अगदी एका वाक्यात प्रभावीपणे सांगते.
माझ्या विषयाला सुरुवात करण्याआधी मी थोडक्यात सांगू इच्छितो की माझे प्रतिपादन कशा प्रकारचे आहे आणि कशा प्रकारचे नाही. समजा आपल्याला सांगण्यात आले की शिकागोच्या गुंडांच्या टोळीत एक व्यक्ती अनेक वर्षांपर्यंत समृद्ध जीवन जगली तर आपण त्या व्यक्तीबद्दल काही अंदाज निश्चितच बांधू शकतो. असे अंदाज काय असतील? तर अशा व्यक्तीत कणखरपणा, चटकन गोळी झाडण्याची ताकद आणि निघड्या छातीच्या मित्रांना आकर्षित करण्याची ताकद असे गुण असावेत. हे तर्क निश्चितच तर्कशुद्ध आहेत. एखादा माणूस कशा प्रकारच्या परिस्थितीत समृद्ध जीवन जगला, ती परिस्थिती जर आपल्याला माहीत पडली तर त्या व्यक्तीबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपण निश्चितच सांगू शकतो. माझ्या प्रस्तुत पुस्तकाचे प्रतिपादन हे आहे की, आपणासकट अन्य सर्व प्राणी हे आपआपल्या जनुकांनी बनवलेली यंत्रे आहेत. शिकागोच्या यशस्वी गुंडाप्रमाणेच आपली जनुके सुद्धा काही बाबतीत लाखो वर्षांपर्यंत जीवघेण्या स्पर्धेच्या परिस्थितीत तग धरुन होती. ह्यावरुन आपल्या जणुकांबद्दल काही गोष्टी आपल्याला सांगता येतील, माझ्यामते त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे यशस्वी जनुके ही दयामाया विरहीत स्वार्थी असावेत. असे स्वार्थी जनुके त्यांना धारण करणा-या जीवांमध्ये सुद्धा स्वार्थीपणाची वागणूक भरतात. तथापी, आपण पुढे बघूच की काही “खास” परिस्थितीत आपले स्वार्थी ध्येय्य साध्य करण्यासाठी असे जनुक “मर्यादीत” प्रमाणात जीवाच्या पातळीवर निस्वार्थी परोपकार भाव सुद्धा जोपासतात. मागच्या वाक्यात “खास” आणि “मर्यादित” हे दोन शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत. अशा परिस्थितीत आपण विचार करु शकतो की, जागतिक प्रेम आणि प्रजातीचे कल्याण ह्या संकल्पनांना उत्क्रांतीच्या अंगाने काहीही अर्थ नाही.


--------------------------------------------------------------------------------------------------------


6 May 2012
उपरोक्त परिश्चेदानंतर मला माझे प्रतिपादन “कशाबद्दल नाही” हे सांगणे सोपे जाणार आहे. मला उत्क्रांतीआधारित नैतिकतेची वकिली करायची नाही. मला कशा प्रकारे गोष्टी उत्क्रांत होत गेल्या हे सांगायचं आहे. मानसाने नैतिकतेने कशा प्रकारे जगावे हे मी सांगत नाही. मी हे ठासून ह्या करिता सांगतो आहे की, मला त्या बहुसंख्य लोकांकडून चुकीचं समजल्या जाण्याची शक्यता आहे जे लोक “काय आहे” आणि “कसे असावे” ह्या दोन गोष्टींमध्ये नेहमीच गल्लत करतात. माझे स्वत:चे प्रामाणिक मत हे आहे की, जो मानवी समाज दयामायाहीन स्वार्थी जनुकांच्या जागतिक नियमांवर आधारित असतो असा घाणेरडा समाज आपल्या राहण्यासाठी चांगला नाहीच. परंतु, दुर्दैवाने, आपण ज्या गोष्टींचा फार विरोध करुन त्याला खोडायचा प्रयत्न करतो म्हणजे ती गोष्ट असत्य आहे असा होत नाही. हे पुस्तक तसे पाहता आपणास रोचक वाटणार आहे पण जर तुम्ही त्यातून काही नैतिकतेच्या गोष्टी काढण्याचा प्रयत्न करत अससाल तर मग तुमच्यासाठी इशारा आहे. पहिला इशारा हा की, जर तुमची अशी इच्छा असेल (माझी सुद्धा आहे!) की असा समाज निर्माण करायचा ज्यात सर्व सामाजीक घटक निस्वार्थीपणे एका चांगल्या ध्येय्यासाठी वागतात, तर तुम्हाला नैसर्गिक जगापासून फारच थोडी मदत मिळण्याची शक्यता आहे. निस्वार्थी भाव आणि परोपकार शिकवण्याची फारच आवश्यकता आहे कारण आपण मुळातच स्वार्थी जन्मलो आहोत. आपण जरा समजून घेण्याचा प्रयत्न करुया की आपली स्वार्थी जनुके काय काय स्वार्थीपणा करु शकतात कारण त्यानंतरच कदाचीत आपल्याला इतर कोणत्याची प्रजातींनी केलं नसेल ते काम, म्हणजे जनुकांची रचना बदलवण्याची संधी प्राप्त होऊ शकते.
उपरोक्त शिकवणीनंतर असा नैसर्गिक अर्थ काढल्या जाऊ शकतो की, एका पिढीकडून दुस-या पिढीकडे आलेले गुण हे न बदलणारे असतात. आपली जनुके आपल्याला स्वार्थी बनवण्याचा प्रयत्न करतात हे जरी खरं असलं तरी सुद्धा आयुष्यभर आपण आपल्या जनुकांच्या शिकवणीनुसारच चालतो असेही नाही. सर्व प्राण्यांमध्ये माणूस हा प्राणी मोठ्या प्रमाणावर संस्कृतीच्या प्रभावाखाली असतो आणि शिकलेल्या गोष्टींनी प्रभावित होऊन असे प्रभाव तो सतत इतरांना देत  असतो. काही जण असेही म्हणतील की संस्कृती ही इतकी जास्त प्रभावी असते की जनुके मग ती स्वार्थी असो अथवा नसो मानवी स्वभाव समजून घ्यायला कामी पडत नाहीत! अन्य काही लोक ह्याच्या विरोधी आपले मत मांडतील. हे अवलंबुन आहेत ’निसर्ग प्रभावाने सर्व काही होते की जन्मानंतर झालेल्या संस्कारांनी सर्व काही होते’ ह्या मानवी स्वभावाला व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणा-या चर्चेत तुम्ही कुठे उभे आहात यावर. यावरुन मला हे पुस्तक कशाबद्दल नाही ह्या संदर्भात दुसरी गोष्ट मांडायची आहे. हे पुस्तक ’निसर्ग प्रभावाने सर्व काही होते किंवा जन्मानंतर झालेल्या संस्कारांनी सर्व काही होते’ ह्या वादविवादाबद्दल नाही. माझं ह्या वादाबद्दल मत आहे पण मी ते सांगू इच्छित नाही, ह्याला अपवाद आहे शेवटचे संस्कृतीच्या संदर्भातले प्रकरण. जर खरोखरच जनुके ही आधुनिक मानवाच्या वागणूकीला जबाबदार नसतील तर एक फारच रोचक असा प्रश्न पडतो की मग ते कोणते नियम आहेत जे आधूनिक मानवाच्या वागणूकीला निर्धारीत करतात आणि आपण इतक्यातच अपवाद कसे झालो? आणि समजा जर आपली प्रजात ही अपवादात्मक नसेल तर त्या निसर्ग नियमांचा अभ्यास करणे आणखीच महत्त्वाचे होऊन बसते.
******************************************************************************************* 
(10 May 2012)

ह्या पुस्तकाबद्दल तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे पुस्तक मानवाच्या किंवा इतर कोणत्याही प्रजातीच्या इत्यंभूत वागणूकीबद्दल नाही. मी वागणूकीची उदाहरणे केवळ उदाहरणादाखल देणार आहे. मी असे म्हणणार नाही की, “बबून ह्या माकडाची वागणूक ही स्वार्थी आहे म्हणून माणसाची वागणूक सुद्धा स्वार्थी असण्याच्या संभावना जास्त असतात. शिकागो गुंडाच्या टोळीचं उदाहरण हे आपण इथे सुद्धा लागू करु शकतो. मानव आणि बबून हे दोघेही निसर्ग निवडीने उत्र्कांत झालेले आहेत. जर तुम्ही निसर्ग निवड कशी काम करते हे बघीतले तर लक्षात येईल की, जे काही निसर्ग निवडीने उत्र्कांत होईल ते ते स्वार्थी असेल. म्हणून आपण अपेक्षा करायला हरकत नाही की जेव्हा बबून, मानव किंवा कोणत्याही जीवाची वागणूक आपण बघू तेव्हा ती आपल्याला स्वार्थीच आढळेल. पण जर आपल्याला मानवी वागणूक ही निस्वार्थी आढळली, जी या न्यायाने आपल्यासाठी अनपेक्षित आहे, तर मात्र गोंधळाची परिस्थिती उत्पन्न होईल जिचे स्पष्टीकरण आपल्याला द्यावे लागेल.
पुढे जाण्याआधी काही व्याख्यांची आपल्याला गरज आहे. एखादी प्रजात, उदा. बबुन ला आपण निस्वार्थी कधी म्हणनार? जेव्हां बबून सारखी प्रजाती ही स्वत: नुकसान सहन करुन दुस-या प्रजातीचे कल्यान घडऊन आनेल. स्वार्थी वागणूक उपरोक्त व्याख्येच्या अगदीच उलट गोष्ट असते. प्रजातीचे कल्याण होणे म्हणजे काय तर तीच्या जगण्याच्या शक्यता वाढणे. जगण्याच्या शक्यता वाढणे म्हणजे जन्म घेणे, जगणे आणि जगण्याच्या शक्यता कमी करणे म्हणजे मृत्यू येणे इतका साधा अर्थ या मागे निश्चितच नाही. आता डार्विनच्या सिद्धांताच्या आधूनिक संल्षेशणाने हे सिद्ध झाले आहे की, जगण्याच्या शक्यता वाढवण्याला कारणीभूत ठरणा-या, अगदी नगण्य वाटणा-या, छोट्या छोट्या परिणामांनी सुद्धा उत्क्रांतीवर फार मोठा परिणाम होत असतो कारण अशा बदलांना प्रकट होण्याकरीता प्रचंड काळ उपलब्ध असतो.
*************************************************************************************

(12 May 2012)
परारर्थवादाची उपरोक्त व्याख्या ही मानसीक पातळीवरची नसून वागणूकीसंबंधी आहे. मी इथे प्रेरक शक्तींच्या मागे कार्यरत मानसशास्त्राबद्दलची मांडणी करत नाही आहे. मी हे सूद्धा मांडू इच्छित नाही की जे जीव निस्वार्थीपणे वागतात ते त्यांचा निस्वार्थीपणा हा एका छुप्या स्वार्थी हेतूने चोखाळतात. कदाचीत ते तसे करत ही असतील किंवा कदाचीत करत ही नसतील किंवा त्या बद्दल आपल्याला काही कळणारही नसेल. काही का असेना पण या बाबतीत हे पुस्तक नाही. माझी व्याख्या ही केवळ या बाबतीत आहे की कोणत्याही वागणूकीमागील प्रेरणा ही स्वार्थी अथवा निस्वार्थी जीवाची जगण्याची संधी वाढवत असते.
कोणत्याही जीवाच्या वागणूकीचा त्याच्या जगण्याच्या संभावनांवर होणारा दूरागामी परिणाम जानणे ही एक फारच गुंतागूंतीची गोष्ट आहे. प्रत्यक्षत:, एखाद्या वागणूकीच्या कृत्याला जेव्हा आपण निस्वार्थीपणाची उपरोक्त व्याख्या लागू करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा “वरवर पहाता” हा शब्द वापरावाच लागेल. वरवर पाहता एखाद्या प्रजातीची निस्वार्थी क्रिया ही त्या जीवाला (अगदी नगण्य प्रमाणात का होईना) मृत्यूकडे ढकलणारी व ज्या अन्य जीवाच्या बाबतीत ती केली जाते त्या जीवाला जगण्याची संधी देणारी असते. पण अगदी जवळून बघितले तर ह्याच्या अगदीच उलट गोष्ट आपल्याला बघायला मिळू शकते, म्हणजे वरवर पाहता एखाद्या जीवामध्ये आढळणारा परार्थवाद हा खरा म्हणजे छुपा स्वार्थवादच असतो. पुन्हा एकदा मी स्पष्ट करु इच्छितो की, “कोणत्याही कृत्यामागची प्रेरणा हा छुपा स्वार्थच असतो” असे मला म्हणायचे नाही. स्पष्ट करण्यासाठी वरपांगी स्वार्थी आणि परार्थी वाटणा-या वागणूकीची काही उदाहरणे मी इथे देऊ इच्छितो. माणसाबद्दल उदाहरणे दिली तर आत्मनिष्ठ विचार करण्याची सवय आड येते म्हणून मी मानवेत्तर प्राण्यांची उदाहरणे इथे देऊ इच्छितो. सुरुवातीला काही स्वार्थी वागणूकीची उदाहरणे आपण बघूया.

*************************************************************************************
(14 May 2012)

1
11) ब्लॅक हेडेड गल (Blackheaded gulls) नावाचे पक्षी मोठ्या वसाहतींमध्ये आपली घरटी करतात. त्यांची घरटी एकमेकांपासून अगदी काही फुटांवरच वसलेली असतात. जेव्हा पक्षांची पीलं अंड्यातुन बाहेर पडतात तेव्हां ती अगदीच छोटी आणि प्रतिकारहीन असतात. अशा इतरांच्या पिलांना अन्य ब्लॅक हेडेड गल ना खाऊन टाकणे अगदीच सोपे असते. जेव्हां शेजारच्या घरट्यातल्या एखाद्या पक्षाचे लक्ष नसते किंवा ते अन्न गोळा करण्यासाठी बाहेर असतात तेव्हा शेजारी पक्षी आपल्या शेजारच्या पिलांना झटपट गिळंकृत करतात. यामूळे अशा पिलांना चोरणा-या पक्षांना अतीषय उत्तम प्रतीचं अन्न तर मिळतेच सोबतच अन्य ठिकाणी मासेमारी करीता जाण्याचा त्रासही वाचतो व स्वत:च्या घरट्याचं चांगलं संरक्षणही करता येते.

2.   प्रेइंग मॅंटीस (praying mantises) नावाच्या किटकाच्या मादीमध्ये आढळूण येणारा भयंकर असा स्वप्रजाती भक्षणाचा स्वभाव (cannibalism) हा स्वार्थीपणाचं उत्तम उदाहरण आहे. मॅंटीस हे मोठ्या आकाराचे मांसाहारी किटक असतात. ते सामान्यत: छोट्या माशांसारख्या किटकांना फस्त करतात पण कोणत्याही हलणा-या वस्तूंवर आक्रमण करण्याची त्यांची सवय असते. त्यांच्यात नर आणि मादी जेंव्हा संभोग करतात तेव्हा नर काळजीपूर्वक मादीच्या पाठीवर चढतो, तीला मागून पकडतो आणि संभोग करतो. परंतु जर का मादीला संधी मिळाली तर जेव्हां नर तीच्याकडे समागमाकरीता येतो किंवा तीच्यावर चढण्याचा प्रयत्न करतो किंवा समागमानंतर सुद्धा ती नराचे डोके तोडून टाकते व त्याला फस्त करते. खरं म्हणजे हे अतीषय संयूक्तीक वाटते की जोवर संभोग पूर्ण होत नाही तोवर तीनं थांबाव आणि संभोग संपल्यावर नराला खावं पण जर तीला संधी मिळाली तर ती संभोगाआधी (किंवा दरम्यान) सुद्धा नराचं डोक फस्त करते कारण डोकं तुटल्यानंतर सुद्धा नराचं उर्वरीत शरीर संभोगासाठी उपयोगी पडतं. या ही पुढे नराच्या मेंदूमध्ये काही निरोधात्मक तंत्रिका केंद्र असल्याने नराचे डोके तुटल्यामुळे त्याची संभोग करण्याची शक्ती वाढते व मादीला सकस अन्न मिळण्यासोबतच हा अधिकचा फायदा मिळतो!

3.  स्वार्थी हा शब्द खरं म्हणजे अशा टोकाच्या स्वप्रजाती भक्षणाच्या उदाहरणासाठी थीटा शब्द वाटतो. पण आपल्या व्याख्येमध्ये चपखल बसतो. कदाचीत अंटार्टिक्ट प्रदेशातल्या एंपेरर पेनग्विनच्या (emperor penguins) भित्र्या स्वभावाबद्दल आपण अधिक सहाणूभूतीने विचार करु. पाणवठ्याच्या काठावर ते ब-याच काळासाठी पाण्यात जावे की नाही ह्या उहापोहात उभे असतात कारण त्यांना भिती असते की पाण्यात दबा धरुन बसलेले सिल (seals) त्यांची शिकार करु शकतात. काठावर ब-याच वेळापासुन ताटकळत बसलेल्या अनेक पेनग्विन पैकी एखाद्याने जरी पाण्यात उडी मारली तरी सर्वांना समजून जाते की पाण्यात सिल आहे की नाही. साहजीकच कोणालाही बळीचा बकरा बनायचं नसतं म्हणून ते वाट बघतात आणि कधी कधी तर शेजा-याला पाण्यात ढकलून सुद्धा देतात.
सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे, स्वार्थीपणा हा काही मौल्यवान संसाधने जसे अन्न, जागा अथवा जोडीदार इतरांशी न वाटने अशा रुपात दृष्टीगोचर होतो. आता वर वर पाहता परार्थी वाटणा-या वागणूकीची काही उदाहरणे आपण बघूया.
*********************************************************************************************
(20 May 2012)

1.  आपल्या मधाच्या पोळ्याचे रक्षण करण्यासाठी कामकरी माश्यांचा दंश मारण्याचा स्वभाव हा अत्यंत नामी असा संरक्षणाचा मार्ग आहे. पण अशा कामकरी माशा, ज्या दंश मारण्याचं काम करतात, त्या आत्मघाती पथकाप्रमाणे हे काम करतात. दंश देण्याच्या क्रियेमध्ये बहुंतांश वेळा अशा माश्यांच्या शरीरातले महत्त्वाचे अवयव (उदा. मेंदू) तुटून बाहेर येतात व अशा माश्या दंश दिल्यानंतर लगेच मृत पावतात. तिच्या ह्या आत्मघातामुळे एकुणच मधमाशांच्या पोळ्याचं संरक्षण होऊन मधाचा अमुल्य साठा वाचवला जातो पण त्या मधाचा लाभ घेण्यासाठी आत्मघाती माश्या ह्या जगात नसतात. आपल्या व्याख्येप्रमाणे हे निस्वार्थी स्वभावाचं एक उत्तम उदाहरण आहे. लक्षात असू द्या की इथे आपण जाणीवपूर्वक केलेल्या बलिदानाबद्दल बोलत नाही आहोत. असे जाणीवपूर्वक प्रयत्न कदाचीत निस्वार्थी उदाहरणात आणि स्वार्थी उदाहरणात उपस्थितही नसतील आणि आपल्या व्याख्येसाठी असे जाणीवपूर्वक स्वभाव अप्रासंगिक आहे.

2. आपल्या मित्रांसाठी प्राणाचे बलिदान देणे हे निश्चितच परार्थी स्वभावाचं उदाहरण आहे पण त्यांच्यासाठी थोडीशी जोखीम पत्करने हा सुद्धा परार्थवादच आहे. अनेक छोटे पक्षी ससाण्यासारख्या शिकारी पक्षांना बघून धोक्याचा इशारा देतात या इशा-यामुळे अन्य पक्षी सावध होतात आणि आपला बचाव करतात. आता असे इशारे दिल्यामुळे जरी इतर पक्षी सावध झाले तरी इशारा देणा-याने स्वत:ला मात्र शिकारी पक्षाचे ध्यानाकर्षन करुन धोक्यात टाकलेले असते. खरं म्हणजे ह्या क्रियेत फार जास्त धोका जरी पत्करला गेला नसला तरी वर वर पाहता परार्थवादाच्या आपल्या व्याख्येप्रमाणे हा परार्थवादच आहे.

3.   सर्वात सहज दिसून येणारे परार्थवादाचे उदाहरण म्हणजे पालकांनी, खासकरुन आपल्या आईचा त्यांच्या पिलांसाठी असणारा स्वभाव विषेश होय. ते पिलांना (किंवा अंड्यांना) खोप्यामध्ये अथवा स्वत:च्या शरीरात उबवतात, मोठी किमत चुकऊन त्यांना भरवतात, आणि मोठी जोखीम पत्करुन शत्रूंपासून त्यांचे संरक्षण करतात. याबाबतीत केवळ एकच उदाहरण आपण लक्षात घेऊया, जमीनीवर अंडी घालणा-या अनेक पक्षांकडे जेव्हां कोल्ह्यासारखे शत्रू जवळ येतात तेव्हा व्याकुळतेचे प्रदर्शन करुन शत्रूला भूलवण्याचा स्वभाव दृष्टीस पडतो. जेव्हां शत्रू घरट्याकडे येतात तेव्हा पालक एक पंख जणू तुटला आहे अशा प्रकारे लंगडत घरट्यापासून दूर पळ काढतात. शत्रूला वाटते की जखमी अवस्थेतलले सोपे भक्ष आपल्याला मिळेल म्हणून पिलांना सोडून ते सुद्धा पक्षांकडे धाव घेतात. घरट्यापासून पुरेसे दूर आल्यानंतर शत्रुच्या जबड्यात अडकणार इतक्यात आपले लंगडेपणाचे ढोंग झटकून पालक उंच आकाषात भरारी घेतात. या मूळे स्वत: जोखीम पत्करुन पक्षी आपल्या घरट्याचे रक्षन करतात.
*********************************************************************************************